एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, ९ एप्रिल, २०२४

रात्रभर आपण कोडिंग करत आहोत...

 रात्रभर आपण कोडिंग करत आहोत... गोलाईव्ह होईल तेव्हा आपण कुठे असू ? मेंदूतले त्राण राखून ठेव. कुठेही असलो तरी गोलाईव्ह होणारच. तू धीर धर. आपण धीर धरू. रात्रभर आपण कोडिंग करत आहोत...

माझा हात हातात धर.
भिऊ नकोस. एक गोष्ट सांगतो
जी बॉसने न्यूकमरला सांगितली होती :
बॉस म्हणाला,"प्रोग्रॅम चालतो म्हणजे बग नसतो.
पण बग येतोच आणि मग प्रोग्रॅम चालत नाही."
न्यूकमर ने गोष्ट ऐकली आणि तो विश्वासाने झोपला .
हि गोष्ट फक्त रात्रभर कोडिंग करणार्यासाठीच आहे.
रात्रभर आपण कोडिंग करत आहोत... कोडिंग करताना आपण काळोखात या गोष्टीची सोबत असेल जी बॉसने न्यूकमरला सांगितली होती. आणि बॉस न्यूकमरशी खरे बोलत नाहीत. म्हणून तर बॉसला टक्कल पडतं . रात्रभर आपण कोडिंग करत आहोत... गोलाईव्ह होईल तेव्हा आपण जागे असू. तेव्हा आपण कुठे असू? कुठेही असलो तरी गोलाईव्ह होणारच . कुठेही असलो तरी आपण बग काढत असू . उडणाऱ्या न्यूकमरच्या केसांना टकलाचा हळुवार भास असेल. माझा हात तुझ्या हातात असेल . सर्वत्र सर्वत्र निरामय गोलाईव्ह असेल. रात्रभर आपण कोडिंग करत आहोत...करणार आहोत....... -केशवसुमार (भटके प्रोग्रॅमर )

सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४

शूर अम्ही सरदार अम्हाला लाज न कसली भीती !

शूर अम्ही सरदार अम्हाला लाज न कसली भीती ! देव, देश अन्‌ जनतेसाठी केली आम्ही युती!

ईडीच्या गर्भात उमजली बंडाची ही रीत
कमळाशी लगिन लावलं अता आम्ही निश्चिंत
खुर्चीसाठी टोप्या बदलू अशी आमची ख्याती!
जिंकावे वा लढून मरावं हे न अम्हाला ठावं
मांडवली ही करुन जगावं हेच अम्हाला ठावं
सत्तेपायी सारे विसरू तत्वे धोरण -निती!

जीवनात ही 'घडी' अशीच राहु दे

जीवनात ही 'घडी' अशीच राहु दे कमळाच्या फुलाकडे 'अजित' जाऊ दे

रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला पक्ष खेळणे
पक्षाचा पाठिंबा मुलीस लाभु दे
मुळात मला गुगलीचा छंद आगळा
खेळींचा त्या माझ्या अर्थ वेगळा
जोडतोड करून मला धुंद होउ दे
येऊ दे असेच मला स्वप्न कैकदा
होऊ दे पिएम मला फक्त एकदा
स्वप्नातच या मजला धन्य होउ दे

जगीं हा खास वेड्यांचा । पसारा माजला सारा ।

जगीं हा खास वेड्यांचा । पसारा माजला सारा । गमे या भ्रान्त संसारीं । ध्रुवाचा 'वेड' हा तारा ॥

अशा या विविध रंगाच्या । 'मिश्यां' च्या लहरबरळींनीं ।
दुरंगी जाल दुनियेची । भिंत ही रंगली सारी ॥

चल रे सख्या चल रे सख्या चौकशीला

चल रे सख्या चल रे सख्या चौकशीला
तू ध्यानी जरा ठेव, जिथे सत्ता तिथे चेव
चल टाळू इडी अन् आयटीला
दिनदयाळ मर्गाच्यावर
मंदिर भाजपचे सुंदर
दोघे आहे उभे दारावर
जोडुनी दोन्ही कर तत्पर
ते पाहू त्यांचे रूप, लावू ऊद आणि धूप
करु वंदन शामोंच्या मूर्तीला
भाजपच्या दारी कुणा ना बंदी
इडी पीडित होती आनंदी
दुर्जन होती भक्तीचे छंदी
आली चालून छान ही संधी
तू सोडून दे 'हात', धरू कमळाची ही वाट
पाहू डोळे भरुनी जगजेठीला
वाली सीबीआयचा दिल्लीत
दर्शन घेऊ जोडुनी हात
तो देईल 'चौकशी' साथ
नांदू 'संसदी' नंतर सुखात
तुला सांगतो त्रिवार, नको देऊ तू नकार
आज 'विकासा'च्या हाकेला

शक्यता

आमची प्रेरणा  

1.

समग्र
निवडणूक रोख्यांची गाथा
लिहायची,
खरीखुरी, तर,
निव्वळ नागडं
व्हावं लागेल,
कुणालाही.
खरंतर, प्रत्येकालाच.
सबब,
भयग्रस्त सकलजन
आवरणबद्ध.
आरटीआयसुद्धा
कायद्याच्या टणक बंदोबस्तात,
कडेकोट !
-O-
2.
काल रात्री
अंधारलेल्या गल्लीत गाठून
काही बातम्यांना
गळा घोटून ठार मारलं मी.
आज,
कदाचित,
मला झोप लागेल
शांतनिवांत.
-O-
3.
प्रचार संपला
म्हणून प्रचार संपत नाही.
निवडणूक संपली
म्हणून निवडणूक संपत नाही.
सर्वसंहारक मतदान घडून गेलं,
म्हणून कुणाचंच महाभारत संपत नाही.
सरकारस्थापनेनंतरही
शक्यतांच्या हजार शक्यता असतात,
त्यांचं काय करशील ?
-O-
- केशावसुमार.

गुरुवार, ६ जुलै, २०२३

गुरूने दिला हा फुटीचा वसा ...

 गुरूने दिला हा फुटीचा वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा

'पिताबंधु' तुम्ही, तुम्ही माउली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा !

जिथे काल खंजिर पुलोदातले
तिथे आज वेलीवरी ही फुले
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा !

शिकू कपटता, धुर्तता, स्वार्थता
धरू चोर विद्येसवे भ्रष्टता
मनी ध्यास हा 'मामु' लागो असा !

जरी पक्ष कोणी करू शासन
युती अघाड्यांचे करू पालन
जनी-मानसी हाच आहे ठसा !

तुझी कर्म सारी फळा ये अशी
तुझी कीर्ती राहील दाही दिशी
अगा धूर्तकपटी बुऱ्या माणसा !